सीबीएसईच्या १०वी, १२वीत मुलींचीच बाजी; तान्या सिंह, युवाक्षी वीजला ५००पैकी ५००
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 06:12 AM2022-07-23T06:12:18+5:302022-07-23T06:12:49+5:30
गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या १०वी व १२वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात मुलांपेक्षा मुलींनीच अधिक बाजी मारली आहे.
सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या तान्या सिंह, नाेएडाची युवाक्षी वीज या विद्यार्थिनींनी ५००पैकी ५०० गुण मिळविले आहेत. सीबीएसईने या परीक्षांसाठीची गुणवत्ता यादी यंदाही जाहीर केलेली नाही. कोरोना साथीमुळे शाळा बंद असल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा २०२० सालापासून बंद करण्यात आली. यंदा सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या ३.२९ टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत ३३ हजार विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक, तर १.३४ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
यंदा उत्तीर्णांचे प्रमाण घसरले
- कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे विशेष मूल्यांकन पद्धतीद्वारे सीबीएसईने परीक्षांचा निकाल जाहीर केला होता.
- गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे.
- हेच प्रमाण २०१९मध्ये ८३.४० टक्के, २०२० साली ८८.७८ टक्के होते. सीबीएसईच्या १०वी परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे.