सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर, उत्तर प्रदेशातील मेघना श्रीवास्तव पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:57 PM2018-05-26T12:57:18+5:302018-05-26T13:38:04+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे .या परीक्षेत ८३.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे .या परीक्षेत ८३.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशातील स्टेप बाय स्टेप महाविद्यालातील मेघना श्रीवास्तव बोर्डात पहिली आली आहे.तिला ५००पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. तिने गाझियाबाद विभागातून परीक्षा दिली. पहिल्या तीन क्रमांकावर एकूण नऊ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून ८८.३१टक्के मुली तर ७८.९९ मुलांनी यश मिळवले आहे. दिव्यांग विभागातून विजय गणेश हा विद्यार्थी ५०० पैकी ४९२गुण मिळवत पहिला आला आहे. निकालानुसार एकूण १२हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ९५टक्क्यांपेक्षा जास्त तर ७२हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित केले आहेत.
यंदा इयत्ता बारावीची परीक्षा दि. ५ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची भारतातील ४ हजार १३८ तर परदेशातील ७१ केंद्रांवर परीक्षा झाली. मंडळाच्या www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहेत.
ठळक मुद्दे :
- २०१७-१८सालचा सीबीएसई बोर्डाचा बारावी निकाल जाहीर, ८३.०१ विद्यार्थी उत्तीर्ण
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले, मागील वर्षी ८२.२टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
- यंदाही मुलींची बाजी, उत्तीर्णांमध्ये ८८.३१ टक्के मुली आणि ७८.९९टक्के मुलांचा समावेश
- त्रिवेंद्रम विभागातून ९७.३२टक्के, चेन्नई विभागातून ९३.८७टक्के तर दिल्ली विभागातून ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
- यंदाच्या निकालानुसार एकूण १२हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ९५टक्क्यांपेक्षा जास्त तर ७२हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित केले आहेत.
- विदेशी शाळांमधील ९४. ९४टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
- यंदा १०वी आणि १२वी मिळून सीबीएसई बोर्डामार्फत २८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात १६ लाख ३८हजार विद्यार्थ्यांनी दहावीची तर ११ लाख ८६हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.
- सीबीएसई इतिहासात पहिल्यांदाच पेपर फुटीच्या प्रकरणामुळे सीबीएसई बोर्ड चर्चेत आले होते. यामध्ये १०वीचा गणित तर १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. अखेर चर्चेनंतर १०वीची पुनर्परीक्षा घेण्यात आली नाही तर १२वीची अर्थशास्त्राची पुनर्परीक्षा २५एप्रिलला पार पडली.
- मागील्या वर्षी आलेल्या परीक्षेत नोएडा येथील रक्षा गोपाळ पाहिली, चंदीगढची भूमी सावंत दुसरी तर आदित्य जैन आणि मनंत लुथरा संयुक्तपणे तिसरे आले होते.