नववी, दहावी, अकरावीच्या आधारे बारावीचे गुण देण्याचा पर्याय; कोरोनामुळे सीबीएसईचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:17 AM2021-05-31T07:17:21+5:302021-05-31T07:17:37+5:30
परीक्षेबाबत उद्या सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.
बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बारावीच्या परीक्षांबाबत एक बैठक नुकतीच झाली. त्यात सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
- शाळांना माहिती गोळा करण्याची सूचना
कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) या संस्थेने २७ मे रोजी म्हटले आहे की, अकरावी इयत्तेत विद्यार्थ्याने विविध विषयांत सरासरी गुण किती मिळविले याची माहिती गोळा करण्यास शाळांना सांगण्यात आले आहे.
तसेच बारावीमध्ये शाळेअंतर्गत झालेल्या परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याचाही तपशील जमा केला जात आहे. त्या गुणांचा विचार करून बारावीच्या विद्यार्थ्याला अंतिम गुण देता येतील का, याची पडताळणी सुरू आहे.
आज याचिकेची सुनावणी
कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज, सोमवारी ३१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय काय आदेश देते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
- राज्यातील शिक्षण मंडळाचेही लक्ष
बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्र्णय घेणार याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शिक्षण मंडळांचेही लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्यास बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण द्यायचे कसे हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे.
परीक्षा रद्द झाल्यास राज्यातील शिक्षण मंडळेही बारावीचे गुण देताना सीबीएसईप्रमाणे नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार घेण्याच्या पर्याय स्वीकारू शकतात.
दोन टप्प्यात परीक्षेचा पर्याय
कोरोना साथीमुळे बारावीची परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत.
१ ते २० ऑगस्ट बारावीची परीक्षा घ्यावी किंवा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतच बारावीची परीक्षा घेण्यात यावी. त्यांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जावेत.
ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जावी, असा दुसरा पर्याय सीबीएसईने मांडला होता.