शाळेला दांडी मारताय तर सावधान; अन्यथा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला मुकावं लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 06:10 PM2020-01-02T18:10:54+5:302020-01-02T18:11:34+5:30
या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यांनाच हॉल तिकीट देण्यात येणार आहे.
दिल्ली - दहावी आणि बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर ठेपल्या असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने(CBSE) नोटीस जारी केलं आहे. सीबीएसईने शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत की, १ जानेवारी २०२० मधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट करावी. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना परीक्षेत बसण्याची परवानगी देऊ नये असा आदेश देण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यांनाच हॉल तिकीट देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी असेल अशा विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. या यादीवर ७ जानेवारी रोजी अंतिम निर्णय होणार आहे. जर योग्य कारणास्तव विद्यार्थी गैरहजर राहिला असेल तर त्या विद्यार्थ्याला पुरावे सादर करण्यास सांगितले जाईल.
नोटीसीनुसार यासाठी दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना उत्तर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर मुदतीत विद्यार्थ्यांकडून खुलासा आला नाही तर त्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव केला जाणार आहे. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा २६ फेब्रुवारी २०२० पासून सुरु होऊन १८ मार्च २०२० पर्यंत चालणार आहे. तर बारावीची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ३० मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.