केजरीवाल यांच्या घरातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त; मालीवाल यांचे भाजपच्या इशाऱ्यावर काम, आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 03:04 PM2024-05-20T15:04:21+5:302024-05-20T15:05:56+5:30

हल्ल्याचे फुटेज मिळविण्यासाठी पोलिस पथकाने सीसीटीव्ही डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) सह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

CCTV DVR seized from Kejriwal's house; Maliwal's work at the behest of BJP, AAP's allegation | केजरीवाल यांच्या घरातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त; मालीवाल यांचे भाजपच्या इशाऱ्यावर काम, आपचा आरोप

केजरीवाल यांच्या घरातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त; मालीवाल यांचे भाजपच्या इशाऱ्यावर काम, आपचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या चौकशीसंदर्भात दिल्ली पोलिसांचे एक पथक रविवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. हल्ल्याचे फुटेज मिळविण्यासाठी पोलिस पथकाने सीसीटीव्ही डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) सह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे, तर केजरीवाल यांना अडकविण्यासाठी मालीवाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप आपने केला आहे. आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज काढून टाकल्याचा दावा पोलिस करत आहेत; परंतु ते पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलेत. सीसीटीव्ही कॅमेरे बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली आहेत आणि ते त्यांच्या ताब्यात आहेत.

एक वेळ होती जेव्हा निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो, आज १२ वर्षानंतर आम्ही आरोपीला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. मनीष सिसोदिया आज येथे असते, तर इतके वाईट माझ्यासोबत घडले नसते. स्वाती मालीवाल,
राज्यसभा सदस्य, आप

पोलिसांच्या डायरीतील छायाचित्रे माध्यमांत कशी?
१३ मे रोजी या प्रकरणाची तक्रार मालीवाल यांनी केली होती आणि काही वेळातच या प्रकरणाच्या दैनिक डायरीतील नोंदीची छायाचित्रे सर्व माध्यमांमध्ये दिसली. या प्रकरणात ३५४ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो अतिशय संवेदनशील प्रकार आहे. असे असतानाही एफआयआर सर्वत्र प्रसारित करण्यात आला. मात्र, आरोपीकडे एफआयआर प्रत नाही. निवडणुकीपूर्वी 'आप'ची प्रतिमा मलिन करण्यासाठी पोलिस भाजपच्या इशाऱ्यावर कथा रचत आहेत, असा आरोप भारद्वाज यांनी केला.

कोठडी घ्या, पण कोणत्याही प्रकारचा छळ करू नका : कोर्ट
केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांची ५ दिवस पोलिस कोठडीत रवानगी करताना आरोपीला पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे मत दिल्लीतील एका न्यायालयाने म्हटले. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट गौरव गोयल यांनी दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. पुरावे गोळा करण्यासाठी कुमारला मुंबईसह विविध भागांत नेण्याची गरज असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तपास यंत्रणेला खटल्यातील सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास पूर्ण करण्याची संधी दिली पाहिजे; परंतु त्याच वेळी आरोपीच्या अधिकारांचेही संरक्षण केले पाहिजे, असे कोर्टाने म्हटले. न्यायालयाने कुमार यांची दर २४ तासांनी तपासणी करण्याचे आणि तपास यंत्रणा आरोपीचा 'कोणत्याही प्रकारचा छळ करणार नाही, यासाठी निर्देश दिले.
 

Web Title: CCTV DVR seized from Kejriwal's house; Maliwal's work at the behest of BJP, AAP's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.