‘नेट’ परीक्षेच्या केंद्रावर सीसीटीव्ही, जॅमर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:41 AM2018-12-16T08:41:55+5:302018-12-16T08:42:31+5:30
पहिलाच प्रयोग : युजीसी घेणार देशातील २३५ शहरांमध्ये परीक्षा; साडेनऊ लाख विद्यार्थी
एसके गुप्ता
नवी दिल्ली : युजीसीद्वारे घेण्यात येणारी नेट परीक्षा यंदा सीसीटीव्ही, जॅमर लावलेल्या केंद्रांवर होणार आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार करू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ डिसेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत १० टप्प्यात ही परीक्षा देशातील २३५ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षा केंद्रावर मोबाइल किंवा इंटरनेटशी जोडले जाणारे कोणतेही उपकरण कामच करू नयेत, यासाठी जामर बसविण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएने पहिल्यांदाच परीक्षेसाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी लोकमतला सांगितले की, परीक्षेसाठी ९.५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा पारदर्शक करण्यासाठी आहे, गैरप्रकार रोखण्यासाठी हायटेक तंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ५९९ केंद्रांवर होणार आहे. यूपीएससी परीक्षेच्या वेळीही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. हे देशात एवढ्या मोठ्या स्तरावर पहिल्यांदाच होत आहे. काही केंद्रांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच कोण्याही प्रकारचे गॅजेट सोबत आणू नका, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ प्रवेश पत्र आणि ओळख पत्र एवढेच सोबत आणावे, असेही सांगण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
ऑनलाइन नव्हे केवळ कॉम्प्युटरवर
च्परीक्षा ऑनलाइन होणार असल्याचा लोकांनी आतापर्यंत समज करून घेतला आहे. पण ही परीक्षा केवळ कॉम्प्युटरवर होणार आहे. यासाठीची प्रश्नपत्रिका सॉफ्टवेअरद्वारे कम्प्युटरवर उपलब्ध करून दिली जाईल.
च्विद्यार्थ्यांना पेनचा वापर करण्याऐवजी केवळ उत्तरांवर क्लीक करावे लागेल, असेही विनीत जोशी यांनी सांगितले.