बंडखोरांचा मुख्यमंत्र्यांवर ‘सीडी बॉम्ब’
By admin | Published: March 27, 2016 12:19 AM2016-03-27T00:19:59+5:302016-03-27T00:19:59+5:30
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला शनिवारी नवी कलाटणी मिळाली. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी स्टींग आॅपरेशनची एक सीडी प्रसिद्ध करून मुख्यमंत्री हरीश रावत
नवी दिल्ली/देहरादून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला शनिवारी नवी कलाटणी मिळाली. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी स्टींग आॅपरेशनची एक सीडी प्रसिद्ध करून मुख्यमंत्री हरीश रावत आमदारांची खरेदी आणि त्यांना लालुच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला. बंडखोरांचा हा आरोप मुख्यमंत्री रावत यांनी सपशेल फेटाळून लावला असून, भाजपची ही घाणेरडी खेळी असल्याचा आरोप रावत यांनी केला आहे. आमदारांच्या घोडेबाराचा आरोप पूर्णपणे खोटा असून या सीडीची न्यायवैद्यक चाचणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
नवी दिल्लीत आयोजित एका पत्रपरिषदेत काँग्रेसचे बंडखोर आमदार संकेत बहुगुणा, हरकसिंग रावत आणि सुबोध उनियाल यांनी ही सीडी जारी केली. मुख्यमंत्री स्वत: आमदारांसोबत सौदा करीत असून कोट्यवधी रुपये देण्याचा प्रस्ताव मांडत आहे. काँग्रेसच्या नऊ बंडखोरांशिवाय भाजपच्याही काही आमदारांना पैशाची लालुच देऊन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या बंडखोरांनी केला. आमदारांना धमक्या दिल्या जात असून त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे केंद्राने आम्हाला सुरक्षा द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र साकेत बहुगुणा यांच्या सांगण्यानुसार हे स्टींग आॅपरेशन एका पत्रकाराने केले आहे. साकेत यांना अलिकडेच पक्षातून सहा वर्षांकरिता बडतर्फ करण्यात आले आहे. भ्रष्टाचार, भूमी माफिया आणि मद्यमाफियांनी उत्तराखंड राज्य बेजार असल्याचा आरोप बहुगुणा यांनी केला.
काँग्रेसच्या नऊ आमदारांनी विधानसभेत अर्थसंकल्प संमत होत असताना बंड केले होते. अर्थसंकल्प मंजूर करताना भाजपा आमदारांनी मतविभाजनाची मागणी करताच काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता.
विधानसभाध्यक्षांनी मागणी फेटाळून गोंधळातच आवाजी मताने बजेट पारित झाल्याचे जाहीर केले, असा या सर्वांचा दावा आहे.
राज्यपालांनी हरीश रावत सरकारला २८ मार्चपर्यंत विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळला : सीडी नकली असल्याचा दावा
दुसरीकडे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी बंडखोर आमदारांचे आरोप फेटाळले आहेत. स्टिंग आॅपरेशनची सीडी नकली असून हा निव्वळ एक तमाशा असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील निर्वाचित सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पदच्युत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार, भाजपाध्यक्ष अमित शहा, तथाकथित पत्रकार आणि बंडखोर आमदारांच्या अभद्र युतीने हा कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीतही काँग्रेसने सीडी बनावट असल्याचा दावा करीत रावत सरकारला बदनाम करण्याचा हा भाजपचा डाव असल्याची टीका केली.
चौफेर माफिया राज
राज्यात भ्रष्टाचाराने सीमा ओलांडली असून चौफेर माफियाराज पसरले असल्याचा आरोप ज्येष्ठ भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांनी केला आहे.
सत्ताधारी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग : काँग्रेसचा आरोप
पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी येथे सांगितले की, उत्तराखंडमध्ये पैसा आणि सत्तेचा दुरुपयोग करूनही अपयशाचा सामना करीत असलेला भाजप उत्तराखंड उच्च न्यायालयातही पराभूत झाल्याने भांबावला आहे. त्यामुळेच आता स्टींगसारखी घाणेरडी खेळी खेळत आहे.
नजर विधानसभा अध्यक्षांकडे
नऊ बंडखोर आमदारांना बजावण्यात आलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी घालून देण्यात आलेली मुदत संपली असून आता या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंह क्रुंजवाल यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
२८ मार्च रोजी विधानसभेत शक्तिपरीक्षण होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.