CDS Bipin Rawat Chopper Crash: IMCमुळे सीडीएस रावत यांच्या चॉपरला अपघात? ९५ टक्के दुर्घटनांमागे हेच प्रमुख कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:20 PM2021-12-10T14:20:32+5:302021-12-10T14:20:51+5:30
CDS Bipin Rawat Chopper Crash: सीडीएस रावत यांच्या चॉपरला अपघात, १३ जणांचा मृत्यू; चौकशी सुरू
नवी दिल्ली: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. तमिळनाडूमधील कुन्नूर येथून वेलिंग्टनला जात असताना रावत यांचं चॉपर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी आणि १२ जण होते. चॉपरमध्ये असलेल्या १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला, तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. इन्स्ट्रुमेंटल मीट्रियोलॉजिकल कंडिशन्समुळे (आयएमसी) चॉपरला अपघात झाला असावा असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ९५ टक्के अपघात आयएमसीमुळेच होतात. रावत प्रवास करत असलेलं एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर अत्याधुनिक आणि सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरचा वापर जगातील जवळपास ५० देश करतात.
चिता आणि चेतकच्या तुलनेत एमआय-१७व्ही५ चॉपर अधिक सक्षम आहे. यामध्ये वेदर रडार आणि ऑटोपायलट सिस्टिम आहे. मात्र तरीही थंड वातावरणात डोंगराळ परिसरात दाट धुक्यातून उड्डाण करताना चॉपरला अडथळे येतात. कोणत्याही फ्लाईटमध्ये आयएमसी यंत्रणा असते. त्या माध्यमातून पायलटला हवामानाची माहिती मिळते. ज्या चॉपरमध्ये आयएमसी यंत्रणा असते, त्याचे पायलट पुढील दिशा ठरवण्यासाठी आयएमसीचा आधार घेतात. अंधारात २ हजार फूट उंचीवर असताना, ढगांचा घेराव २०० फूट असताना पायलट आयएमसीचा वापर करतात.
एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर खराब वातावरणातही उड्डाण करू शकतं. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार धुक्यामुळे अपघात झाला असावा. चॉपर एखाद्या मोठ्या झाडाला धडकलं असावं आणि त्यामुळे दुर्घटना घडली असावी अशी शक्यता आहे. अपघातग्रस्त चॉपरचा फ्लाईड डेटा रेकॉर्डर सापडला आहे. हा ब्लॅक बॉक्स तपासात महत्त्वाची भूमिका बजावेल.