CDS Bipin Rawat Death: हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचे निधन; नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली CCS ची महत्त्वाची बैठक!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:32 PM2021-12-08T18:32:32+5:302021-12-08T18:33:04+5:30
CDS Bipin Rawat Death: अपघातात हेलिकॉप्टरमधील सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाल्याची पुष्टी झाली आहे.
नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crash). या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह 14 जण होते. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात हेलिकॉप्टरमधील सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीचीही बैठक होणार आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हे बुधवारी दुपारी 3 वाजता हवाई दलाच्या Mi-17VH हेलिकॉप्टरमधून नियोजित व्याख्यान देण्यासाठी कुन्नूर जिल्ह्यातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे जात होते. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले होते आणि ते वेलिंग्टनला जात होते. यादरम्यान या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेलिकॉप्टरमध्ये यांच्याही समावेश
हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, नायक विवेक कुमार, नायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल व पायलट यांचा सहभाग होता.
Indian Air Force announces the demise of CDS General Bipin Rawat along with 12 others in chopper crash pic.twitter.com/8Ebrz6OoQZ
— ANI (@ANI) December 8, 2021
अपघाताबाबत संसदेत उद्या माहिती देणार संरक्षणमंत्री
या अपघाताची संपूर्ण माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दिली असून, उद्या (गुरुवारी) संरक्षण मंत्री संसदेत या अपघाताबाबत निवेदन देणार आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांना तामिळनाडूतील लष्करी विमान अपघातस्थळी पोहोचण्यासाठी सांगितले आहे. तसेच, संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.
CCS ची महत्त्वाची बैठक
हेलिकॉप्टर दुर्घटनेवर CCS ची (केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा संबंधी समिती) ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी सांगितले की, कुन्नूर, तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती संबंधित मंत्रालय योग्य वेळी देईल.