कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 09:41 PM2021-12-07T21:41:57+5:302021-12-07T21:42:32+5:30
CDS Bipin Rawat warns against biological warfare : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. आता तर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत ( Bipin Rawat) यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे. या कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे बिपिन रावत यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, बिम्सटेक (Bimstec) सदस्य देशांचा समावेश असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासाच्या कर्टेन रेजर कार्यक्रमात, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) यांनी देखील कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आणि संसर्गाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ, यावरून सतर्क केले आहे. यावरून कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही, हेच दिसून येते.
या कार्यक्रमात भारतासह बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, थायलंड, श्रीलंका आदी देश सहभागी होत आहेत. सीडीएस बिपीन रावत यांनी कर्टेन रेजर कार्यक्रम पॅनेक्स-21 मध्ये सांगितले की, मी आणखी एक मुद्दा उपस्थित करू इच्छितो. तो म्हणजे नवीन व्हेरिएंट युद्धाचे स्वरूप घेत आहे. या विषाणूंचा आणि रोगांचा आपल्या देशावर परिणाम होऊ नये म्हणून आपण स्वतःला बळकट करून त्याचा सामना करावा लागेल. आता कोरोनाचे ओमायक्रॉन व्हेरिएंट समोर आले आहे. जर ते इतर स्वरूपात बदलले, तर आपल्याला त्यासाठी तयार राहावे लागेल, असे बिपीन रावत म्हणाले.
आपल्या सर्वांसाठी आपण आपल्या बुद्धिमत्तेने एकमेकांना साथ देणे अत्यंत आवश्यक आहे, असे जनरल बिपीन रावत म्हणाले. तसेच, जनरल बिपीन रावत यांनी याकडेही लक्ष वेधले की, जगातील सशस्त्र दलांना आपत्तींचा सामना करण्यासाठी विशेष तयारी करावी लागेल. कोरोना दरम्यान, असे दिसून आले की प्रत्येक देशाने आपल्या नागरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मदत करण्यासाठी संरक्षण दलांचा वापर केला. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी सदस्य देशांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींशी लढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.