CDS Bipin Rawat यांचं हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झालं? समोर आली महत्त्वाची माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 12:47 PM2022-01-02T12:47:36+5:302022-01-02T12:49:41+5:30
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कशामुळे क्रॅश झाले, याचा तपास करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती.
नवी दिल्ली: भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह लष्करातील १४ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. अगदी पंतप्रधान मोदींपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत संपूर्ण देशवासीयांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली होती. मात्र, अति महत्त्वाच्या पदावर असलेल्या बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कशामुळे क्रॅश झाले, याचा तपास करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात आता मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे मोठे आणि महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह समितीने चौकशी पूर्ण केली असून, कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आल्याचे सांगितले जात आहे.
खराब हवामानामुळे वैमानिक 'विचलित' झाले असावेत
वायुसेनेच्या वतीने या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या समितीने अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिक विचलित झाले असावे, यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच Controlled Flight Into Terrain असे म्हटले जाते, असे सांगितले जात आहे. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे लेक्चर नियोजित होते. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. दोन इंजिन असलेले IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली. रशियन बनावटीचे हे हेलिकॉप्टर सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरले जाते.