CDS Bipin Rawat Chopper Crash: हेलिकॉप्टरच्या पायलटनं 'तसा' कोणताच कॉल केला नव्हता; समोर आली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:53 AM2021-12-10T10:53:02+5:302021-12-10T10:56:17+5:30
CDS Bipin Rawat Chopper Crash: बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरला अपघात झाला. या अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या कुन्नरहून वेलिंग्टनला जात असताना रावत यांचं चॉपर दुर्घटनाग्रस्त झालं. या चॉपरमध्ये एकूण १४ जण होते. त्यापैकी केवळ एक जण बचावले. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर बंगळुरूच्या कमांड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वातावरण खराब असल्यानं रावत यांच्या चॉपरला अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हेलिकॉप्टरला अपघात होण्यापूर्वी पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला तसा कोणताही कॉल केला नव्हता अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं न्यूज १८ नं दिली आहे. हेलिकॉप्टरला अपघात होण्यापूर्वी पायलटकडून कोणताही इमर्जन्सी कॉल केला नव्हता असं वृत्त न्यूज १८ नं दिलं आहे. आम्ही वेलिंग्टनच्या हेलिपॅडवर लँड करण्यास सज्ज आहोत, असा संदेश पायलटकडून एटीसीला देण्यात आला होता.
तमिळनाडूच्या कुन्नरहून वेलिंग्टनला जात असताना चॉपरला अपघात झाला. त्यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी दिल्लीत आणण्यात आले. पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज नरवणे, नौदल प्रमुख आर. हरिकुमार, हवाई दल प्रमुख ए. व्ही. आर. चौधरी, संरक्षण सचिन अजय कुमार उपस्थित होते.
जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सर्वसामान्यांना घेता येईल. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत सैन्य दलाचे जवान श्रद्धांजली अर्पित करतील. दुपारी २ वाजता रावत आणि त्यांच्या पत्नीचा अखेरचा प्रवास सुरू होईल. संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर बरार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.