जनरल बिपिन रावत यांची 'ही' इच्छा राहिली अपुरी, काकांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 12:21 PM2021-12-09T12:21:20+5:302021-12-09T12:22:55+5:30
जनरल बिपीन रावत यांचे काका भरतसिंह रावत उत्तराखंडमधील सायना या गावात राहतात. त्यांनी बिपीन रावत यांची एक इच्छा अपुरी राहिल्याची माहिती दिली.
पौडी: काल तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातातमृत्यू झाला. त्यांच्यासोबत पत्नी आणि इतर 11 अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. जनरल बिपिन रावत यांची एक मोठी इच्छा अपुरी राहिली आहे. बिपीन रावत यांचे काका निवृत्त हवालदार भरतसिंह रावत(70) उत्तराखंडमधील सायना या त्यांच्या मूळ गावी राहतात. त्यांनी बिपीन रावत यांच्या इच्छेबद्दल माहिती दिली.
भरतसिंह रावत यांनी सांगितले की, बिपीन रावत यांची एक मोठी इच्छा होती, ही इच्छा आता अपुरी राहणार आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, बिपीन रावत यांना सायना या त्यांच्या मूळ गावी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधायचे होते. जनरल रावत यांच्या या सायना गावात फक्त त्यांच्या काकांचे कुटुंब राहते. सायना गावात एकूण तीन घरे असून, त्यापैकी एका घरात काकांचे कुटुंबीय आहे, तर उर्वरित दोन घरे रिकामी आहेत.
रावत कुटुंब दुःखात
भरत सिंह रावत यांना बिपीन रावत यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. त्यांनी सांगितले की, बिपीन रावत हे त्यांच्या गावाशी आणि घराशी खूप जोडलेले होते. अनेकदा त्यांच्याशी फोनवरही बोलत असत. जनरल रावत यांनी आपल्या काकांना सांगितले होते की, ते एप्रिल 2022 मध्ये गावी परतणार आहेत आणि गावात एक घर बांधायचे आहे. डोळ्यातील अश्रू पुसत भरतसिंह रावत म्हणाले की, आपल्या पुतण्याची ही इच्छा आता अपूर्ण राहणार आहे.
वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधायचे होते
त्यांनी सांगितले की जनरल रावत लष्करप्रमुख झाल्यानंतर एप्रिल 2018 मध्ये शेवटचे त्यांच्या गावात आले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवृत्त झाल्यानंतर गावात घर बांधून गावातील शांत वातावरणात राहण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. जनरल रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण रावत कंटुबासह गावात शोककळा पसरली आहे. आजुबाजूच्या गावातून लोक येऊन भेट घेत आहेत. उद्या दिल्लीत जनरल रावत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल.