बिपीन रावत अन् मधुलिका रावत यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; दोन्ही लेकी भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:14 PM2021-12-11T17:14:11+5:302021-12-11T17:14:40+5:30
आज बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले.
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले.
जनरल बिपीन रावत यांच्या दोन्ही मुली आज सकाळी दिल्ली येथून लष्कराच्या विशेष विमानाने त्यांचे वडील बिपीन रावत आणि आई मधुलिका रावत यांच्या अस्थी घेऊन हरिद्वारला पोहोचल्या होत्या. दोघांनी हिंदू रीतिरिवाजानूसार अस्थी गंगा नदीत विसर्जन केल्या. वडील आणि आईच्या अस्थीविसर्जन करताना दोन्ही मुली भावूक झाल्याचे दिसून आले.
Kritika and Tarini, the daughters of #CDSGeneralBipinRawat and Madhulika Rawat immerse the ashes of their parents in Haridwar, Uttarakhand. #TamilNaduChopperCrashpic.twitter.com/r1IGJ2X1m5
— ANI (@ANI) December 11, 2021
तत्पूर्वी, जनरल रावत यांची अखेरची यात्रा अत्यंत भावनिक होती. संपूर्ण मार्गावर फुलांचा वर्षाव केला होता आणि हाती तिरंगा घेऊन जनरल बिपीन रावत अमर रहेच्या घोषणाही दिल्या जात होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी आर्मी कँट भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी भारताचे तिन्ही लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यापूर्वी कधीही एखाद्या लष्करी अधिकाऱ्याच्या अंतिम दर्शनासाठी एवढी गर्दी जमली नव्हती. उपस्थितांनी पानावलेल्या डोळ्यांनी आपल्या हिरोला अखेरचा निरोप दिला.
अंत्ययात्रेला जनसागर उसळला-
जनरल बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला दिल्लीत जनसागर उसळला होता. आपल्या वीर योद्ध्याच्या सन्मानार्थ ‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ च्या घोषणा दिल्या होत्या. बिपीन रावत यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या वाहनाच्या सोबत शेकडो लोक हातात तिरंगा घेऊन घोषणा देत होते. दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत जनरल रावत यांच्यावर अंत्यविधी पार पडले. त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिल्यावर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
चार देशाचे उच्च अधिकारी उपस्थित-
सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक तर जमले होते. शिवाय, श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला.