(सीडीसाठी) महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्यांकडून ग्राहकाच्या दागिन्यांचा अपहार
By admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:51+5:302016-01-24T22:38:25+5:30
नाशिकमध्ये गुन्हा दाखल : साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने
नाशिकमध्ये गुन्हा दाखल : साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने
नाशिक : शरणपूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत एका ग्राहकाने ठेवलेल्या साडेपाच लाखांच्या सोन्याचा बँकेच्या शाखाधिकार्यांसह दोघा उपमहाव्यवस्थापकांनी अपहार केल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बँकेच्या या तिन्ही अधिकार्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरणपूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोने तारण विभागात शाखा अधिकारी म्हणून संशयित निशा प्रियदर्शिनी, उपमहाव्यवस्थापक अर्चना मगर व जयेश आंबेकर हे तिघे कार्यरत आहेत़ गंगापूर रोड परिसरात राहणारे डॉ़ रामनाथ पाटील यांचे शरणपूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खाते (६०१२६५०७७६)आहे़ पाटील यांनी घरातील २०५़७७ ग्रॅम सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते.
डॉ़ पाटील यांनी बँकेच्या सोने तारण विभागात पाकीट क्रमांक जी / ४३ मध्ये ५ लाख ३१ हजार १३२ रुपयांचे २०५़७७ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते़ बॅँकेचे लेखापरिक्षण करताना सोने ठेवलेले पाकीटच न आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. बँकेचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत बहरराव संगणबटला (५८, रा़ ईशा सोसायटी, भाविकनगर, डिजीपीनगर, गंगापूर) यांनी या विभागाच्या चाव्या संशयित प्रियदर्शिनी, मगर व आंबेकर यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तिघांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
शाखा व्यवस्थापक संगणबटला यांना सोने तारण विभागातील डॉ़ पाटील यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बँकेतील या तिघा कर्मचार्यांविरुद्ध फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत़ (प्रतिनिधी)