CDSCO चाचणी... तुम्ही रोज जी औषधे घेता त्यातील ४८ ठरली नापास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:31 PM2023-04-28T12:31:27+5:302023-04-28T12:31:46+5:30
विशेष म्हणजे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरलेले नमुने हे नियमित वापरातील औषधांचे आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) ताज्या तपासणीत नियमित वापरातील ४८ औषधांचे नमुने निर्धारित पातळीपेक्षा (मानक) कमी गुणवत्तेचे असल्याचे आढळून आले आहे. मार्चमध्ये विविध उत्पादन युनिटमधून घेतलेल्या औषधांच्या १४९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यांतील १४४९ नमुने तर गुणवत्ता चाचणीत यशस्वी ठरले; मात्र ४८ नमुने (३ टक्के) निर्धारित गुणवत्तेचे नसल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरलेले नमुने हे नियमित वापरातील औषधांचे आहेत. यात अँटासिड (ॲसिडिटीसाठी वापरले जाणारे औषध), ॲण्टिबायोटिक्स व रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांचा समावेश आहे, असे या राष्ट्रीय औषध नियामक संस्थेने सांगितले. फेब्रुवारीत सीडीएससीओच्या चाचणीत १२५१ पैकी ५९ (५ टक्के) नमुने कमी गुणवत्तेचे आढळले होते.
नेमकी कोणती औषधे?
मल्टी-व्हिटॅमिन औषधांपासून ते एचआयव्हीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषध रिटोनावीरचाही या यादीत समावेश आहे. गॅबापेंटिन, हायपरटेन्शनचे औषध तेलमिसार्टन, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड व मेटफॉर्मिन, आयर्न व फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १२, अमोक्सीसिलिन, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी ३ गोळ्यांसह मेस्वाक टूथपेस्टचेही यात नाव आहे.
औषधे चाचणीत का अयशस्वी झाली ?
औषध बनवण्यास वापरलेली सामग्री प्रमाणित पातळीवर नसणे, त्यांतील घटकांच्या प्रमाणात गडबड असणे व चुकीचे लेबलिंग, आदी कारणांमुळे हे नमुने चाचणीत अयशस्वी ठरले.