एलओसीवरील गोळीबाराविरोधात भारत आक्रमक; पाकिस्तानी राजदूतांना समन्स
By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 07:59 AM2020-11-15T07:59:55+5:302020-11-15T08:02:34+5:30
पाकिस्तानकडून दिवाळीच्या पूर्वसंध्येला नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार
नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भारताकडून समन्स बजावण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा निषेध केला आहे.
‘’भारताने CEPC उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज दिले, रॉ ने ७०० दहशतवादी तयार केले’’
पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून भारताच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना नाहक लक्ष्य केलं जात आहे. त्याबद्दल भारतानं अतिशय कठोर शब्दांत आपला निषेध नोंदवला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. 'उत्सव काळात नियंत्रण रेषेवर सुरू असलेला बेछूट गोळीबार आणि त्या माध्यमातून शांतता भंग करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या 'चार्ज डी अफेयर्स'ना समन्स बजावण्यात आलं. सीमेवर पाकिस्तानकडून विनाकारण सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा निषेध त्यांच्या समक्ष करण्यात आला,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.
भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुली
सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर अगदी उघडपणे मदत करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं. पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरपासून गुरेज सेक्टरपर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ५ जवान शहीद झाले. याशिवाय ११ नागरिकांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ११ सैनिक मारले गेले आणि १२ जण जखमी झाले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅडदेखील उद्ध्वस्त झाले.