आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन करा मेट्रोत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 02:11 PM2018-04-05T14:11:12+5:302018-04-05T14:11:12+5:30
मेट्रो स्थानकांवरही वाढदिवस साजरा करता येणार
हॉटेल, रिसॉर्ट, परदेशात किंवा एखाद्या रम्य ठिकाणी वाढदिवस साजरा करावा, असे अनेकांना वाटते. आपला वाढदिवस अविस्मरणीय व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. अशा लोकांना आता मेट्रोमध्ये वाढदिवस साजरा करता येईल. याशिवाय मेट्रोच्या स्थानकांवरही वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करता येऊ शकेल. जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जेएमआरसी) या संदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे काही दिवसांतच मेट्रोची स्थानके किंवा मेट्रो बुक करुन जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करता येईल.
जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो आणि मेट्रो स्थानके भाडे तत्त्वावर देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र मेट्रो सेवेच्या निर्धारित कालावधीनंतरच अशाप्रकारे मेट्रो रेल्वे आणि तिची स्थानके भाडे तत्त्वावर दिली जातील. जेएमआरसीला सध्या पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे केवळ तिकिटाच्या आधारे मिळणाऱ्या पैशांवर मेट्रो सेवा चालवणे जेएमआरसीला अवघड जात आहे. त्यामुळेच आता मेट्रो आणि स्थानके वाढदिवसांसारख्या समारंभांसाठी भाड्याने देऊन अतिरिक्त कमाई करण्याचा जेएमआरसीचा प्रयत्न आहे.
जेएमआरसीकडून तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये चित्रपट आणि जाहिरातींच्या चित्रीकरणाचाही उल्लेख आहे. त्यामुळे चित्रीकरणासाठीही निर्माते मेट्रो किंवा स्थानके भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. या प्रस्तावाला जेएमआरसीच्या सर्व अधिकाऱ्यांनी मान्यतादेखील दिली आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणानुसार दोन तासांसाठी निर्मात्यांना १ लाख रुपये मोजावे लागतील. यामुळे चांदपोल ते मानसरोवर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मेट्रोमध्ये निर्मात्यांना चित्रीकरण करता येईल. जास्तीत जास्त निर्मात्यांनी चित्रीकरण करावे, यासाठी भाडे कमी ठेवण्यात आल्याचे जेएमआरसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. जेएमआरसीला उत्पन्नाचे अधिकाधिक स्रोत मिळावेत, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीदेखील या अधिकाऱ्याने दिली.