प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला मग ‘लाइव्ह येत संपवलं जीवन’, पत्नी म्हणाली; ‘ती’ ब्लॅकमेल करायची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:45 AM2023-09-14T06:45:31+5:302023-09-14T06:46:00+5:30
Crime News: एका व्यक्तीने गुरुग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसच्या रूममधूनच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत पंख्याला गळफास लावून घेतला.
एका व्यक्तीने गुरुग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसच्या रूममधूनच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत पंख्याला गळफास लावून घेतला. तरुणी अनेक महिन्यांपासून त्याला व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करत होती, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ हिसार येथील रहिवासी दोन मुलांचा पिता विक्रम (३५) रविवारी संध्याकाळी तरुणीसह (वय २०) गेस्ट हाऊसमध्ये गेला होता. विक्रमने आत्महत्या केली तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूममध्येच होती, असा दावा विक्रमच्या पत्नीने केला आहे. गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्यावर तरुणीने तिचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दाखवण्यासाठी विक्रमला त्याच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. ती हिमाचल प्रदेश (मंडी) ची असून विक्रम विवाहित असल्याचे माहीत होते. ती एका व्हिडीओद्वारे पतीला ब्लॅकमेल करत होती. त्याने तिला आधीच २० लाख रुपये दिले होते; परंतु ती आणखी मागत होती. पोलिसांनी तिचा फोन तपासल्यावर सत्य बाहेर येईल, असा पत्नीचा
आरोप आहे.
तर, ‘आमच्या माहितीनुसार, विक्रमने गळफास लावण्यापूर्वी ती महिला खोलीतून निघून गेली होती. आम्ही गेस्ट हाऊसमधून सीसीटीव्ही फुटेज मिळवत आहोत आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहोत’, असे पोलिसांनी सांगितले. विक्रम फार्माकोलॉजीचा कोर्स करत होता. तिथेच त्याची तरुणीसह ओळख झाल्याचे समजते. दरम्यान, लाइव्ह आत्महत्येची धक्कादायक घटना चर्चेत आहे.