गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेटी, राजकारण्यांचा ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 02:12 PM2017-12-31T14:12:12+5:302017-12-31T14:14:40+5:30
पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात केंद्रीय मंत्री, उद्योगपती, न्यायाधीश, बॉलिवूड कलाकार दाखल झालेले आहेत.
पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात केंद्रीय मंत्री, उद्योगपती, न्यायाधीश, बॉलिवूड कलाकार दाखल झालेले आहेत. संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेही गोव्यात आहेत. अभिनेता आमिर खान व पत्नी किरण राव गोव्यात आहे. नववर्ष स्वागताबरोबरच लग्नाचा वाढदिवसही हे दाम्पत्य गोव्यातच साजरे करणार आहे.
केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अजित सिंह सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्यात दाखल झालेले आहेत. किना-यांवर देश, विदेशी पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. अनेक मंत्री, न्यायाधीश, वरिष्ठ अधिकारी खासगी भेटीवर गोव्यात आहेत. कोल्हापूर, बेळगाव, सातारा भागातील काही तरुण पर्यटक केवळ काही तासांसाठीच मौजमजा करण्यासाठी गोव्यात येतात. एखाद्या किना-यावर रात्र काढून दुस-या दिवशी पहाटे परततात त्यांचेही जथे किना-यांवर दिसत आहेत.
देशी पर्यटकांचे टाइट बेत
देशी पर्यटकांनी थर्टी फर्स्टचे टाइट बेत आखले आहेत. उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, हणजुण, वागातोर, हरमल तर दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, बेतालभाटी, पाळोळे, आगोंदा बोगमाळो किना-यांवर दिवसभर पाहुण्यांची गर्दी होती. गोव्यातील किनारी भागात पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांनी आरक्षण केले होते. पर्यटकांचे तांडे सकाळपासून दिसून येत असून किना-यांकडे जाणारे रस्ते फुल्ल झाले आहेत. एका अंदाजानुसार दोन लाखाहून अधिक पर्यटक गोव्यात आहेत. सायंकाळपर्यंत हा आकडा आणखी वाढणार आहे.
सेलिब्रिटींनी नेहमीप्रमाणे आपल्या हाय फाय संस्कृतीनुसार बंदिस्त हॉटेलांमध्ये पार्ट्यांमध्ये धुंद होऊन सरत्या वर्षाला निरोप देणेच पसंत केले आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने न्यु इयरनिमित्त सांता मोनिका जेटीवरुन विशेष जलसफरींचे आयोजन केले आहे. रात्री उशिरापर्यंत जलसफरी घडवून आणल्या जाणार असून बोटीवर नृत्य, भोजन आदी व्यवस्था आहे.
अनेक ठिकाणी पार्ट्यांचेही आयोजन आहे. वागातोर येथे पार्टीत आघाडीचे डीजे तसेच लंडनचा स्पीन मास्टर त्रिस्तान पेशकश करतील. आग्वाद येथे सिंक नाईट क्ब्लब, उतोर्डा येथे प्लेनेट हॉलिवूड बचि रिसॉर्ट, मोबोर येथे हॉलीडे इन रिसॉर्ट, हणजुण येथे किंगफिशर न्यु इयर बीच पार्टी, सिक्रेट आयलँड पार्टी शिवाय बागा येथे टिटो लेन, हडफडें येथे क्लब कबाना, हणजुण येथे कर्लिस, आगोंदा येथे लिपर्ड व्हॅली आदी पार्ट्यांचे आयोजन आहे.
दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकारने पुरेशी काळजी घेतल्याचा दावा पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांनी केला. नाताळ-नववर्षाच्या काळात कोणीही सुट्टी घेऊ नये, असे सक्त निर्देश पोलिसांना देण्यात आले होते. उत्तर गोव्यात कळंगुट, कांदोळी, हणजुण आदी किनारी भागातच ८00 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. केवळ सुरक्षाच नव्हे तर वाहतूक व्यवस्थाही सांभाळण्याची मोठी जबाबदारी पोलिसांनी पार पाडावी लागत आहे. पण काही ठिकाणी किनाºयांवर वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे चित्रही दिसत आहे.