रक्षाबंधन साजरा करण्याआधीच डोळ्यासमोर बहिणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 01:26 PM2017-08-08T13:26:35+5:302017-08-08T13:31:21+5:30
हरियाणामधील सोनेपत जिल्ह्यात भावासमोर बहिणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
चंदिगड, दि. 8 - हरियाणामधील सोनेपत जिल्ह्यात भावासमोर बहिणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मातंड गावात 35 वर्षीय दलित महिलेची पतीने गोळ्या घालून हत्या केली. यावेळी महिलेचा भाऊ तिथेच उपस्थित होता. हा सर्व भयानक प्रकार त्याच्या डोळ्यांसमोर घडला. बहिणीला गोळ्या घातल्याचं पाहताच तो मदतीसाठी धावला, पण तिला वाचवू शकला नाही. वैष्णोदेवी असं या पीडित महिलेचं नाव होतं. त्यांना दोन मुलं आहेत. देशभरात एकीकडे सर्व भाऊ आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरं करत असताना, नरेश मात्र आपल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत होता.
नरेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीने पती धर्मेंदर विरोधात घरगुती हिंसेची तक्रार केली होती. शनिवारीच ही तक्रार करण्यात आली होती. बहिणीवर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करत पती आणि सासरची माणसं वारंवार तिला मारहाण करायची असा आरोप नरेशने केला आहे.
वैष्णोदेवी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धर्मेंदरला ताब्यात घेतलं होतं. मात्र काही तास चौकशी केल्यानंतर त्याला पत्नीसोबत नीट वागण्याची तंबी देत सोडून देण्यात आलं होतं.
पोलिसांनी सुटका केल्यानंतर धर्मेंदर घरी परतला. घरी परतताच त्याने रागाच्या भरात पत्नीवर गोळीबार केला. 'मी माझ्या बहिणीला भेटण्यासाठी गेलो होतो. मी तिला रस्त्यावरुन मदतीसाठी धावताना पाहिले. तिच्यामागे धर्मेंदर हातात बंदूक घेऊन पळत होता. त्याचे आई-वडिलही तिला मारुन टाक म्हणून ओरडत होते. त्याने तिला पकडलं, आणि जोपर्यत ती मृत्यूमुखी पडली नाही तोपर्यंत गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार पाहून मीही घाबरलो आणि तिथून पळ काढत मदतीसाठी धावलो', अशी माहिती नरेशने दिली आहे.
जर पोलिसांनी धर्मेंदरविरोधात कडक कारवाई केली असती तर आज माझी बहिण जिवंत असती असं नरेश बोलला आहे. पोलिसांनी धर्मेंदर आणि त्याच्या सहा नातेवाईकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हत्या, तसंच बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.