VIDEO: 'बॅटमॅन' आमदाराच्या सुटकेनंतर भाजपा कार्यकर्त्यांचा गोळीबार करुन जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 11:19 AM2019-06-30T11:19:05+5:302019-06-30T11:20:12+5:30
तुरुंगातून सुटलेल्या आमदाराचं भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत
भोपाळ: पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण करणाऱ्या भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. यावेळी विजयवर्गीय यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली.
इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटनं मारहाण केल्यामुळे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती. मात्र शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयानं 20-20 हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. याची माहिती मिळताच विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी एक जण हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्याच्यासमोर विजयवर्गीय यांचे समर्थक भाजपाचा झेंडा घेऊन नाचताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण रस्त्यावर फटाक्यांची माळ पेटवत आहेत.
Madhya Pradesh: Celebratory firing outside BJP MLA Akash Vijayvargiya's office in Indore after he got bail in an assault case. (29-06) pic.twitter.com/d1j2d03hLY
— ANI (@ANI) June 30, 2019
आकाश विजयवर्गीय रविवारी तुरुंगाबाहेर आले. तुरुंगात वेळ चांगला गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी सुटकेनंतर दिली. लोकांसाठी करत असलेलं काम सुरुच राहील, असं विजयवर्गीय यांनी म्हटलं. विजयवर्गीय तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला. यावेळी त्यांना हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आपण या कृतीचं समर्थन करत असून त्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात येईल, असं विजयवर्गीय म्हणाले.