सिमेंट, पेंटवरील जीएसटीमध्ये कपात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:55 AM2018-06-30T05:55:18+5:302018-06-30T05:55:20+5:30
जीएसटीला एक वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकार ५० हून अधिक वस्तुंवरील २८ टक्के कर कमी करण्याच्या विचारात आहे. जीएसटी परिषदेची बैठक दिल्लीत २१ जुलै रोजी होत आहे
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : जीएसटीला एक वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकार ५० हून अधिक वस्तुंवरील २८ टक्के कर कमी करण्याच्या विचारात आहे. जीएसटी परिषदेची बैठक दिल्लीत २१ जुलै रोजी होत आहे. जीएसटी कशी यशस्वी झाली हे मोदी यांना लोकांना सांगून काही दिलासाही द्यायचा आहे, असे सूत्रांनी सांगितले.
व्यापारी, कारखानदार, उत्पादक व ग्राहकांचे २८ टक्के जीएसटी कमी करण्यासाठी दडपण वाढत आहे. त्यामुळे पेंट्स, सीमेंट, मार्बल, टाइल्स, वॉर्निशेस यावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून कमी केला जाईल.परवडणारी घरे योजना यशस्वी करण्यासाठी कर कपात केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे लक्षात हा विचार सुरू आहे. एअर कंडिशनर्स, फ्रीज, डिजिटल कॅमेरे, पुट्टी, सॉफ्ट ड्रिंक्स व कार्स या गोष्टी विलासी राहिलेल्या नाहीत. तथापि, अर्थ सचिव हसमुख अधिया यांनी महसूल स्थिर नसल्यामुळे कर कपातीला वाव नसल्याचे म्हटले आहे. सध्या ३५ टक्के लोक जीएसटी रिटर्नस फाईल करीत नाहीत. त्यांना आधी कराच्या जाळ््यात आणायचे आहे. सरकारला अपेक्षित १४ टक्के वार्षिक वाढ मिळालेली नाही. करकपातीला अनेक अडचणी आहेत. एकटे सिमेंट महिन्याला सहा हजार कोटींचा कर देते. त्यामुळे त्यावरील कर कपात करू शकत नाही. तरीही काही दिलासा सरकार देणार आहे.