सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचार; बॉलीवूडचे सहकार्य नाही
By Admin | Published: September 13, 2014 02:19 AM2014-09-13T02:19:32+5:302014-09-13T02:19:32+5:30
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून (सीईओ) चित्रपटांना मंजुरी देण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी त्याच्यावर तीन महिने पाळत
नवी दिल्ली : केंद्रीय चित्रपट प्रमाणक मंडळातील (सेन्सॉर बोर्ड) वरिष्ठ वर्तुळात होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणाच्या तपासकामात बॉलीवूडमधील लोकच सहकार्य करीत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून (सीईओ) चित्रपटांना मंजुरी देण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी त्याच्यावर तीन महिने पाळत ठेवण्यात आली होती.
केंद्रीय चित्रपट प्रमाणक मंडळ अर्थातच सेन्सॉर बोर्ड ही देशातील चित्रपट नियामक संस्था आहे जी चित्रपटांच्या विषयांवर नियंत्रण ठेवते व त्याला प्रमाणपत्र देते.
गेल्या महिन्यात सीबीआयने सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना छत्तीसगडच्या एका चित्रपट निर्मात्याकडून त्याच्या चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी कथित रूपाने ७० हजारांची लाच घेतल्याबद्दल अटक केली होती.
याप्रकरणी सीबीआयकडे पुरावे असले तरी ते राकेशकुमारसह या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू शकलेले नाही व चित्रपटांना प्रमाणित करण्यासाठी निर्मात्यांचे झालेले शोषण उघडकीस आणू शकलेले नाही. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, चित्रपटसृष्टी या लाचखोरांची माहिती देऊ शकते. त्यासाठी अनेक ख्यातनाम अभिनेते, निर्माते, दिग्दर्शकांकडे सीबीआयने चौकशीही केली होती. मात्र त्या सर्वांनी याबाबत मौन स्वीकारले. (लोकमत न्यूज नेटवर्क)