नोटबंदीमुळे भारतात गोंधळसदृश परिस्थिती - जागतिक प्रसारमाध्यमे
By admin | Published: November 18, 2016 11:15 PM2016-11-18T23:15:01+5:302016-11-18T23:15:01+5:30
जागतिक प्रसारमाध्यमांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे भारतात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे.
Next
>ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची दखल जागतिक प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, अल जझीरा अशा प्रसारमाध्यमांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे भारतात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे.
500 आणि एक हजाराच्या नोटा सरकारने चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यावर देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी लोक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लावत आहे, असे अमेरिकेती आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. तर नोटबंदीमुळे सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांचे कसे हाल होत आहेत. याचा आढावा बीबीसीने आपल्या स्तंभातून घेतला आहे. गरीब आणि मध्यमवर्गाला यातून फटका बसत असल्याचे वास्तव या स्तंभात मांडले आहे. तसेच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाबाबतही बीबीसीने वृत्त प्रसारित केले आहे.
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रीमंतांकडून का स्वागत करण्यात येत आहे. असा प्रश्न द गार्डियनने आपल्या वृत्तामधून विचारला आहे. तर हाफिंग्टन पोस्टने नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंची आपल्या वृत्तामधून दखल घेतली आहे.
तर अल जझिराने नोटबंदी आणि एटीएममधील खडखडाटामुळे लोकांमध्ये असलेल्या संतापाचे वर्णन आपल्या वृत्तात केले आहे. तसेच वॉशिंग्टन पोस्टनेही नोटबंदीमुळे भारतीय नागरिक कसे मेटाकूटीस आले आहेत याचे वृत्त दिले आहे. द इंडिपेंडेंटनेही नोटबंदीमुळे बँकेत रक्कम जमा करण्यासाठी लोकांची कशी तारांबळ उडाली आहे याचे वर्णन केले आहे.
डेलीमेलने नोट बदलून घेण्यासाठी बँकेत आलेल्या मोदींच्या आईचा उल्लेख करून मोदींच्या निर्णयावर टीका केली आहे. तर फायनान्शियल टाइम्सने नोटबंदीनंतर भारतात उद्भवलेली गोंधळसदृश परिस्थिती कायम असल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. तर या नोटबंदीचा फटका भारताच्या आर्थिक विकासाला बसणार असल्याचे इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने म्हटले आहे.