सेंटोर हॉटेल 50हून अधिक काश्मिरी नेत्यांसाठी बनले 'जेल'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:11 IST2019-08-27T13:02:08+5:302019-08-27T13:11:11+5:30
'हॉटेल एक जेलसारखे असले तरी आम्हाला आनंद आहे, कारण आमचा मुलगा सुखरुप आहे.'

सेंटोर हॉटेल 50हून अधिक काश्मिरी नेत्यांसाठी बनले 'जेल'!
श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर, याला विरोध करणाऱ्या 50 हून अधिक काश्मिरी नेत्यांना येथील एका हॉटेलमध्ये स्थानबद्ध केले आहे. या नेत्यांना सोमवारी आपल्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्यासाठी कपडे, फळे आणि इतर साहित्य आणले होते.
कलम 370 रद्द केल्यानंतर गेल्या 5 ऑगस्टपासून या नेत्यांना श्रीनगरमधील डल नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सेंटोर हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये सज्जाद लोन, इम्रान अन्सारी, यासिर रेसी, इश्फाक जब्बार, अशरफ मीर, सलमान सागर, मुबारक गुल, नईम अख्तर, खुर्शीद आलम, वाहिद पारा, शेख इम्रान आदींचा समावेश आहे.
हॉटेल एक जेलसारखे असले तरी आम्हाला आनंद आहे, कारण आमचा मुलगा सुखरुप आहे, असे या नेत्यांची भेट घेऊन आल्यानंतर एका वयस्कर व्यक्तीने सांगितले. ते म्हणाले, 'आम्हाला काही मिनिटे हॉटेल रुमच्या बाहेर गॅलरीत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. माझ्या मुलाने सांगितले की, याठिकाणी देखभाल होत आहे. मात्र, बाहेर काय चालू आहे, याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. जे लोक भेटायला येत आहेत, त्यांच्याकडूनच काही माहिती मिळत आहे.'
दरम्यान, यावरुन असे समजते की, नॅशनल कॉन्फेंस, पीडीपी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना बाहेरच्या घडामोडींची माहिती मिळत आहे. तर, एका सुरक्षा कर्मचाऱ्यांने सांगितले की, नेत्यांना जेलमध्ये राहण्यासारखीच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये कोणतीही टीव्ही नाही. नेतेमंडळी न्यूजपेपर किंवा पुस्तकं वाचण्यात व्यस्त आहेत.