अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 04:30 PM2019-07-27T16:30:17+5:302019-07-27T21:24:37+5:30
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर याठिकाणी 10 हजार अतिरिक्त सुरक्षा दल पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही जवान काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानामुळे काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी चालविण्यात आलेले अभियान मजबूत होईल. तसेच, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, असे या आदेशात म्हटले आहे.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे घाटीत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "घाटीत अतिरिक्त 10 हजार जवान तैनात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांची काही कमतरता नाही. जम्मू काश्मीरमधील समस्या राजकीय आहेत. त्या लष्कराच्या सहाय्याने सोडविल्या जाऊ शकत नाहीत. केंद्र सरकारला पुन्हा यावर विचार करायला हवा आणि आपले धोरण बदलण्याची गरज आहे."
Centre’s decision to deploy additional 10,000 troops to the valley has created fear psychosis amongst people. There is no dearth of security forces in Kashmir. J&K is a political problem which won’t be solved by military means. GOI needs to rethink & overhaul its policy.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) July 27, 2019
सुत्रांच्या माहितीनुसार, देशातील विविध भागात तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना एअरलिफ्टच्या माध्यमातून थेट काश्मीरला पाठविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या 100 आणखी तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. प्रत्येक तुकडीत 100 जवान असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 जुलै रोजी केंद्रीय सशस्त्र दलांच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचा आदेश जारी केला होता. यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे जवानांचा समावेश आहे.
अजित डोवाल बुधवारी श्रीनगरमधील घाटीच्या दौऱ्यावर होते. याबाबतची कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. यावेळी अजित डोवाल यांनी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यामध्ये राज्यपालांचे सल्लागार के. विजय कुमार, मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यन, डीजीपी दिलबाग सिंह यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सध्या जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू आहे. याआधी 24 फेब्रुवारीला देशभरातून निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या काश्मीरला पाठवण्यात आल्या होत्या. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त जवान गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. याचबरोबर, आता अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतेसाठी निमलष्करी दलाचे जवळपास 40 हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत.