केंद्राने अमरनाथ गुहेपर्यंत बांधला रस्ता, महबुबा मुफ्तींचा पक्ष संतप्त, म्हणाले ‘ही गोष्ट हिंदूंविरोधात…’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:22 PM2023-11-07T17:22:00+5:302023-11-07T17:22:32+5:30
Amarnath Mandir: अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या पर्वतीय रस्त्याचं चौपदरीकरण केलं आहे. मात्र या रस्त्याला आता विरोध होऊ लागला आहे.
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या पर्वतीय रस्त्याचं चौपदरीकरण केलं आहे. भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने सांगितले की, सोमवारी अमरनाथ गुहेपर्यंत गाड्यांचा ताफा पोहोचवला. इतिहासामध्ये पहिल्यांदाच अमरनाथ गुहेपर्यंत वाहने पोहोचली आहेत.
मात्र या रस्त्याला आता विरोध होऊ लागला आहे. महबूहा मुफ्ती यांचा पक्ष असलेल्या पीडीपीने या रस्त्याला विरोध करताना हे बांधकाम निसर्गाविरुद्ध असल्याचं म्हटलं आहे. हा रस्ता हिंदू धर्म आणि निसर्गावरील श्रद्धेबाबत मोठा अपराध आहे. हिंदू धर्म पूर्णपणे आध्यात्मिक आणि निसर्गाशी एकरूप होणारा आहे, असा आरोप पीडीपीच्या प्रवक्त्याने केला आहे.
बीआरओला मागच्या वर्षी गुहेतील मंदिरापर्यंत जाणाऱ्या दुहेरी मार्गाच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं होतं. बीआरओच्या प्रोजेक्ट बीकनमध्ये अमरनाथ यात्रा मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचा समावेश होता. दरम्यान, या रस्त्याच्या बांधकामावर टीका करताना पीडीपीचे प्रवक्ते मोहित भान म्हणाले की, हिंदू धर्माविरोधात मोठा गुन्हा घडला आहे. या धर्मामध्ये स्वत:ला निसर्गामध्ये समाविष्ट केलं जातं. त्यामुळे आमची पवित्र ठिकाणे ही हिमालयाच्या कुशी आहेत. राजकीय फायद्यासाठी धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळांमध्ये परिवर्तित करणं निंदनीय आहे. आम्ही देवाचा कोप जोशीमठ आणि केदारनाथ येथे पाहिला आहे. पण तरीही आपण त्यातून काही शिकलेलं नाही. आता काश्मीरमध्ये विध्वंसाला निमंत्रण देत आहोत.