काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:13 AM2018-12-29T05:13:01+5:302018-12-29T05:13:24+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही.

Center ready for Kashmir elections, Home Minister Rajnath Singh | काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

Next

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही. राज्यात भाजपला सरकार बनवायचे असते, तर ६ महिन्यांच्या कालावधीत तसा प्रयत्न पक्षाने नक्कीच केला असता; मात्र भाजपने तसा कोणताही प्रयत्न केला नाही. राज्यपालांनी वास्तव परिस्थितीचा अहवाल केंद्राकडे पाठवला. अशा स्थितीत राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ चा अवलंब करण्याशिवाय केंद्राकडेही पर्याय राहिला नाही. निवडणुकीसाठी केंद्र सरकार सर्वार्थाने तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत केले. जम्मू-काश्मीरमधे अनुच्छेद ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर या घटनात्मक प्रक्रियेला संसदेच्या मंजुरीसाठी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंग बोलत होते.
जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित व्हावी, राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. निवडणुका आयोजित करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे; मात्र या निवडणुकांसाठी आयोगाने सरकारकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली, तर ती पुरवण्यास केंद्र सरकार सदैव तयार आहे, असे नमूद करीत गृहमंत्री म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दोनदा मी काश्मीरला गेलो.

समाधानकारक तोडगा काढू

काश्मीरची स्थिती अतिशय नाजूक होती तेव्हा लवकरात लवकर ती सुधारावी, अशीच सरकारची प्रामाणिक इच्छा होती. सर्वपक्षीय शिष्टमंडळातले काही नेते फुटीरवादी गटांनाही भेटायला गेले होते. तेथून त्यांना कसे परतावे लागले, याचा उल्लेख ते करीत नाहीत. विद्यमान स्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये लोकतंत्र मजबूत व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे.

सर्वच राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे की, काश्मीरची स्थिती सामान्य व्हावी, यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल आपल्या सूचना अवश्य करा. समाधानकारक तोडगा काढण्याचा गृहमंत्री या नात्याने मी व्यक्तिश: प्रयत्न करायला तयार आहे. अनुच्छेद ३५६ बाबत काश्मीरविषयक चर्चेत समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राजदचे जयप्रकाश नारायण सिंग यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी, अद्रमुक आदी पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला.

Web Title: Center ready for Kashmir elections, Home Minister Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.