सप्टेंबरमध्ये केंद्रात फेररचना? जनता दल .युनायटेड, अण्णा द्रमुक पक्षही सरकारात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:40 AM2017-08-21T05:40:25+5:302017-08-21T05:40:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भाजपाशासित १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी करणार असलेल्या चर्चेने, केंद्रीय मंत्रिमंडळात आणि पक्ष संघटनेत मुख्य बदल होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहेत. जदयू, अद्रमुक यांनाही सरकारात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भाजपाशासित १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी करणार असलेल्या चर्चेने, केंद्रीय मंत्रिमंडळात आणि पक्ष संघटनेत मुख्य बदल होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहेत. जदयू, अद्रमुक यांनाही सरकारात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, मोदी ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेसाठी चीन दौºयावर जाण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी फेररचना होऊ घातली आहे. सध्या आठ मंत्र्यांकडे दोन किंवा
तीन मंत्रालयांची जबाबदारी असल्याने, फेररचना पूर्वीच व्हायला हवी होती, असे बोलले जात आहे. दुसरे म्हणजे, अकार्यक्षम मंत्री घरी पाठविले जातील, असेही समजते.
जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) दाखल झाला आहे. अखिल भारतीय अण्णाद्रमुकचे दोन महत्त्वाचे गट एकमेकांत विलीन होऊन, तेही एनडीएत सामावून घेतले जाणार आहेत. त्यांनाही सरकारमध्ये स्थान दिले जाईल. जदयूचे राज्यसभेतील नेते आरसीपी सिंह आणि बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे चिरंजीव राम लाल ठाकूर यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. अद्रमुकला तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळू शकतात. राज्यपालांच्या आठ जागा रिक्त असून, काही जुन्या नेत्यांना राज्यपालपदाची जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात येते.