इंधनावरील शुल्कात कपात करून जनतेला दिलासा देणार का?; मोदी सरकारनं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:11 AM2021-02-11T03:11:09+5:302021-02-11T07:04:01+5:30
सर्वसामान्यांना इंधन दरवाढीच्या झळा येणाऱ्या काळात साेसाव्या लागणार आहेत.
नवी दिल्ली : तेल वितरक कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी वाढ केल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलचे दर नव्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. ब्रँडेड पेट्राेल आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे दरराेज दरवाढ हाेत आहे. मात्र, केंद्र सरकारची उत्पादन शुल्क कमी करून दरवाढीपासून दिलासा देण्याची मन:स्थिती नाही. केंद्रीय पेट्राेलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत हे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधन दरवाढीच्या झळा येणाऱ्या काळात साेसाव्या लागणार आहेत.
प्रधान यांनी राज्यसभेत प्रश्नाेत्तराच्या तासात विविध प्रश्नांची उत्तरे देताना इंधन दरवाढीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. पेट्राेल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, असे म्हणणे चुकीचे असल्याचे प्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले, की गेल्या ३०० दिवसांमध्ये सुमारे ६० दिवस दरवाढ झाली, तसेच पेट्राेलचे दर ७ दिवस आणि डिझेलचे दर २१ दिवस कमी केले आहेत. मात्र, २५० दिवस दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सरकारने उत्पादन शुल्क वाढविले आहे, तर राज्यांनीही उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करात वाढ केली आहे.
काँग्रेसचे खासदार के. सी. वेणूगाेपाल यांनी इंधन दरवाढीवरून प्रश्न उपस्थित केला हाेता. त्यांच्या गावात पेट्राेलचे दर १०० रुपये प्रतिलिटरपेक्षा जास्त झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्राेलची ३० पैसे आणि डिझेलची २५ पैसे प्रतिलिटर दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्राेलचे दर ९४.१२ रुपये, तर डिझेलचे दर ८४.६३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढले असून, गेल्या वर्षभरात प्रथमच ६१ डाॅलर्स प्रति बॅरलच्या वर दर गेले आहेत.
परभणीत सर्वाधिक भाव
देशात सर्वांत महाग पेट्राेल राजस्थानच्या गंगानगर येथे आहे. पेट्राेलचे दर ९८.०४ रुपये प्रतिलिटर झाले आहेत, तर ब्रँडेड पेट्राेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. यापूर्वी २७ जानेवारीला ब्रँडेड पेट्राेलचे दर १०० रुपयांवर गेले हाेते.
बुधवारी येथे ब्रँडेड पेट्राेलचे दर १०१.१२ रुपये प्रतिलिटर हाेते. राज्यात परभणीत सध्या सर्वोच्च दर आहे. पेट्रोल तेथे ९६.५८ रुपयांवर आहे.
करांबाबत काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?
केंद्र आणि राज्य सरकार कर संकलनाबाबत संवेदनशील आहेत. विविध विकासकामांबद्दल प्रत्येक राज्याच्या गरजा आहेत. त्यासाठी वित्त पुरवठा आवश्यक असताे.
महसूल मिळविण्यासाठी इंधनावरील कर हा स्रोत असून दिलासा देण्यासाठी शुल्कात कपात हाेणार नसल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
असे आहेत सध्या भाव
पेट्राेल डिझेल
मुंबई ९४.१२ ८४.६३
दिल्ली ८७.६० ७७.७३
परभणी ९६.५८ ८५.७२