केंद्रात लवकरच फेरबदल?
By admin | Published: June 17, 2016 02:57 AM2016-06-17T02:57:12+5:302016-06-17T02:57:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हेदेखील पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात किरकोळ बदल करण्याच्या विचारात आहेत.
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हेदेखील पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात किरकोळ बदल करण्याच्या विचारात आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आज शुक्रवारी
विदेश दौऱ्यावरून परत येणार असल्याने, केंद्रीय मंत्रिमंडळात १८ ते २३ जून या दरम्यान फेरबदल केला जाऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी अलाहाबाद येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत मंत्रिमंडळातील फेरबदलावर चर्चा केल्याची माहिती आहे. भाजपा नेतृत्वाला पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर राज्य विधानसभा निवडणुकीची अधिक चिंता आहे. उत्तर प्रदेशमधून आलेले १३ केंद्रीय मंत्री मोदी सरकारमध्ये आहेत, तरीही भाजपाला उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील भवितव्याबद्दल चिंता वाटत आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणार नाहीत, हे आता स्पष्ट झालेले आहे. अलाहाबादेतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजनाथसिंग यांना श्रोत्यांमध्ये, तर अरुण जेटली यांना मंचावर बसविण्यात आल्यामुळे ही बाब स्पष्ट झाली. मोदी यांनी ७६ वर्षीय कलराज मिश्रा यांची जाहीर सभेत प्रशंसा केल्यामुळे मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात मिश्रा यांना डच्चू मिळण्याची शक्यताही मावळली आहे.
मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध जाहीरपणे वक्तव्य केल्याबद्दल, मोदी हे महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याप्रति नाराज असले, तरी मनेका गांधी यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता नाही. गेल्या दोन वर्षांपासून उत्तराखंडला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने, या वेळी त्या राज्यातील एखाद्या खासदाराला कॅबिनेटमंत्री बनविले जाण्याची शक्यता आहे.
राज्यसभा सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांचा पंजाब निवडणुकीत योग्य वापर करण्याची भाजपाची इच्छा आहे. दुसरीकडे शिवसेना आणि तेदेपा हे पक्षही मंत्रिमंडळात अतिरिक्त स्थान मिळण्याची आशा बाळगून आहेत. या फेरबदलात आसाम व मणीपूरलाही प्रतिनिधित्व मिळण्याची दाट शक्यता आहे, तसेच एम. जे. अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्रिपद बहाल केले जाण्याची शक्यता आहे.
सहा वरिष्ठ मंत्र्यांची खुर्ची कायम; गडकरींकडे रेल्वे मंत्रालय?
मोदी सरकारमधील सहा वरिष्ठ मंत्र्यांची खुर्ची कायम राहील आणि मंत्रिमंडळातील हा फेरबदल किरकोळ असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचा कामाचा वेग लक्षात घेता, त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपविण्यात येऊ शकते, असे बोलले जात आहे.
तथापि, आपले सध्याचे खाते बदलायचेच असेल, तर आपल्याला सुरक्षेवरील कॅबिनेट कमिटीवर घेण्यात यावे, अन्यथा आपण सध्याच्या खात्यात समाधानी आहोत. या खात्यातील अनेक अपूर्ण कामे पूर्ण करावयाची आहेत, असे गडकरी यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे.