कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरच्या किती लोकांनी संपत्ती खरेदी केली, केंद्रानं दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 00:08 IST2022-03-30T00:08:01+5:302022-03-30T00:08:35+5:30
'या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात आहेत,' असेही गृह राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरच्या किती लोकांनी संपत्ती खरेदी केली, केंद्रानं दिलं उत्तर
नवी दिल्ली - केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Minister of State for Home Nityanand Rai) यांनी मंगळवारी लोकसभेत महत्वाची माहिती दिली आहे. घटनेतील कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील एकूण ३४ लोकांनी संपत्ती खरेदी केली आहे. बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते हाजी फजलूर रहमान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राय बोलत होते.
बसपा नेत्यानं विचारला होता प्रश्न -
कलम ३७० हटल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्र शासित प्रदेशात (Union Territory) बाहेरील ज्या लोकांनी संपत्ती खरेदी केली, अशा लोकांचा आकडा गृह मंत्री सांगण्याची कृपा करतील? असा प्रश्न बसपा नेत्याने विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्य मंत्री म्हणाले, ३४ व्यक्तींनी आतापर्यंत केंद्रशासित प्रदेशात संपत्ती खरेदी (Bought The Property) केली आहे.
गृह राज्यमंत्र्यांचं उत्तर -
नित्यानंद राय म्हणाले, 'जम्मू आणि काश्मीर सरकारने (Government of Jammu and Kashmir) दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर बाहेरील ३४ व्यक्तींनी कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी केली आहे.' एवढेच नाही, तर 'या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात आहेत,' असेही गृह राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.