केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:32 PM2022-11-28T12:32:29+5:302022-11-28T12:33:22+5:30
वाढीव लष्कर तैनात करणे हा उपाय नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीनगर : काश्मीर प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास त्या भागात कितीही लष्कर तैनात केले तरी तेथील सद्य:स्थितीत कोणताही फरक पडणार नाही, असा इशारा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, भाजप राज्यघटनाच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. भारत हा काही भाजपची मक्तेदारी नाही. काश्मीर भाजपच्या हातात आम्ही कधीही जाऊ देणार नाही. केंद्राने एखाद्या घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये. घुसखोरांना कसे हुसकावून लावायचे हे काश्मिरी लोकांना नीट कळते. हाती १९४७ मध्ये कोणतीही शस्त्रे नसताना काश्मिरींनी घुसखोरांना हुसकावून लावले होते.
गांधीजी, नेहरूंचा भारत आम्हाला अभिप्रेत
मुफ्ती यांनी सांगितले की, महात्मा गांधी, पं. नेहरू यांना जो भारत अभिप्रेत होता, त्याचा शोध काँग्रेस नेते राहुल गांधी हे आता घेत आहेत. देशात जेव्हा हिंदू व मुस्लिम परस्परांविरोधात उभे ठाकले होते, त्यावेळी मुस्लिम समुदायाने काश्मिरी पंडित, हिंदू, शीख यांचे प्राण वाचविले होते.