NEET बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं केंद्रानं केलं स्वागत, शिक्षणमंत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:51 PM2024-07-23T23:51:10+5:302024-07-23T23:51:50+5:30
Supreme Court Verdict On NEET Exam: मागच्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या नीट यूजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं केंद्र सरकारने स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
मागच्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या नीट यूजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच पेपरफुटीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच तसेच परीक्षेची पवित्रता भंग करण्याबाबत सबळ पुरावे सापडलेले नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं केंद्र सरकारने स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सत्यमेव जयते! आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत करतो. आमचे प्राधान्यक्रम असलेले विद्यार्थी आणि त्यांचं भविष्य यावर सरकार नेहमीच विश्वास ठेवल आलं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानतो. समाजातील दुर्बल घटक, एससी, एसटी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमधील कमकुवत वर्ग यांनाही विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नीट परीक्षा न घेण्याचा निर्णय दिला आहे.
दरम्यान, ४ जून रोजी नीट परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेपर लीक प्रकरणावरून काही विद्यार्थी आक्रमक झाले होते. सर्वप्रथम बिहारमध्ये या परीक्षेचे पेपर फुटल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर देशभरात हे प्रकरण पेटत गेले. तसेच देशातील विविध न्यायालयांमध्ये नीटबाबत याचिका दाखल केल्या. तसेच पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली गेली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू झाली. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकऱणी निकाल दिला. तसेच परीक्षेत व्यापक प्रमाणात गडबड झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवाताना पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावली.