बुलेट ट्रेन होणारच! गुजरातच्या हद्दीतलं काम तरी वेळेत पूर्ण करा; मोदींच्या सूचना
By मोरेश्वर येरम | Published: November 26, 2020 02:52 PM2020-11-26T14:52:12+5:302020-11-26T14:57:12+5:30
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या विरोधानंतरही रद्द केला जाणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतचे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारसोबतचे वाद सोडवले जात नसतील तर गुजरातच्या हद्दीतील काम तरी वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मोदींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं समजतं. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामपूर्व कामाच्या संथ गतीवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने गुजरातमधील ३४९ किमी पैकी ३२५ किमीवरील कामासाठीच्या कंत्राटासाठीची निवेदनं मागवली आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गुजरातमधील एकूण जमिनीपैकी जवळपास ८५ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झालेले आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण २५ टक्क्यांहून कमी आहे.