मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:33 IST2024-11-18T15:29:28+5:302024-11-18T15:33:09+5:30
सध्या मणिपूरमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे.

मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
मणिपूरमध्ये आरक्षणावरून उसळलेला हिंसाचार काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ५० तुकड्या मणिपूरमध्ये पाठविण्यात येणार आहेत. जवळपास ५००० जवान मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.
जिरिबाम जिल्ह्यात हिंसाचार भडकल्यानंतर आणि इतर भागात पसरल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानंतर गृह मंत्रालयाने (MHA) 20 अतिरिक्त CAPF कंपन्या, 15 CRPF आणि 5 BSF कंपन्या आधीच मणिपूरमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. परंतू, हे बळ तोकडे पडत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणखी मोठी कुमक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
या आठवड्यापर्यंत अतिरिक्त 50 कंपन्यांना मणिपूरला रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 35 तुकड्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) कडून काढल्या जातील, तर उर्वरित तुकड्या सीमा सुरक्षा दल (BSF) कडून असतील, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.
सध्या मणिपूमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मणिपूरमधील स्थितीवर बैठक घेणार आहेत. यावेळी तेथील हिंसाचार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यावर निर्णय घेतले जाणार आहेत.