केंद्राचा मोठा निर्णय, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ होणार सरकारी अधिकारी; लोकसेवा आयोगाकडून होणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:29 AM2023-05-17T07:29:01+5:302023-05-17T07:30:45+5:30
"१२ सरकारी खात्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली होती."
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची केंद्रीय खात्यांमध्ये संयुक्त सचिव, संचालक, उपसचिव या पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
ते म्हणाले, १२ सरकारी खात्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली होती. कृषी, नागरी हवाई वाहतूक, रसायने व खते, सार्वजनिक वितरण, अवजड उद्योग, शिक्षण खात्यातील उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता हे विभाग, गृहनिर्माण व नगरविकास, वाणिज्य, विधि आदी खात्यांमध्ये ही भरती होणार आहे. याआधी संयुक्त सचिव, संचालक, उपसचिवपदांवर आतापर्यंत अ श्रेणीतील अधिकारी नेमण्यात येत असत.
या पदांची जाहिरात २० मे रोजी यूपीएससी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. इच्छुक उमेदवार २० मे ते १९ जून या कालावधीत अर्ज करू शकतात. किती पदांवर भरती होणार आहे, याचा तपशील जाहिरातीत देण्यात येणार आहे.
तिसरी भरती मोहीम
केंद्रीय खात्यांमध्ये संयुक्त सचिवपदाच्या १० जागांवर भरती करण्यासाठी कार्मिक खात्याने पहिल्यांदा २०१८ साली खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून अर्ज मागविले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे त्या पदांवर भरती करण्यात आली. २०२१ साली केंद्र सरकारने विविध खात्यांमधील ३ संयुक्त सचिव, १९ संचालक, ९ उपसचिव या पदांसाठी भरती केली होती. आता तिसऱ्यांदा अशाच पद्धतीने भरती होईल.