सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे तीन वर्षांत विद्युतीकरण करण्यास केंद्राचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 04:35 AM2018-09-13T04:35:49+5:302018-09-13T04:36:08+5:30
भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
या कामास १२,१३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या इंधनावरील खर्चात दरवर्षी १३,५१० कोटी रुपयांची बचत होईल, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले. हे विद्युतीकरणाचे काम सन २०२१-२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक वाहतूक असलेल्या सर्व महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचे याआधीच विद्युतीकरण झालेले आहे. मात्र अधल्या-मधल्या व अगदी टोकाच्या काही मार्गांचे विद्युतीकरण झालेले नसल्याने त्याठिकाणी सध्या इंजिने बदलावी लागतात. पूर्ण विद्युतीकरण झाल्यावर रेल्वेची कार्यक्षमता, वेग, सुरक्षतता व वहनक्षमता वाढेल.
सध्या रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीपैकी सुमारे ७५ टक्के व प्रवासी वाहतुकीपैकी निम्म्याहून अधिक वाहतूक विजेवर चालणाऱ्या गाड्यांनीच होत असली तरी एकूण इंधनामध्ये विजेचा वाटा फक्त ३७ टक्के आहे. विजेचा वापर वाढल्यावर डिझेलचा वापर २.८३ अब्ज लिटरने कमी होईल व साहजिकच एकूण इंधनखर्चातही बचत होईल. या विद्युतीकरणाच्या कामाने २०.४ कोटी नवे थेट रोजगार उपलब्ध होतील, असेही सरकारचे म्हणणे आहे.