इस्लामिक स्टेटचं आव्हान पेलण्यासाठी केंद्राची विशेष बैठक
By admin | Published: August 1, 2015 01:41 PM2015-08-01T13:41:50+5:302015-08-01T13:41:50+5:30
इस्लामिक स्टेटच्या भारतात उद्भवू शकणा-या आव्हानाचा सामना करण्यासाठी नियोजन करावं या उद्देशाने केंद्र सरकारने १२ राज्यांच्या उच्चस्तरीय पोलीस अधिका-यांची विशेष बैठक बोलावली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - इस्लामिक स्टेटच्या भारतात उद्भवू शकणा-या आव्हानाचा सामना करण्यासाठी नियोजन करावं या उद्देशाने केंद्र सरकारने १२ राज्यांच्या उच्चस्तरीय पोलीस अधिका-यांची विशेष बैठक बोलावली आहे. इस्लामिक स्टेट भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या विचारात असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने तसेच अमेरिकेतील तज्ज्ञांनी दिला होता. या इशा-याची दखल घेत केंद्र सरकारचे गृहसचिव एल. सी. गोयल यांनी १२ राज्यांच्या पोलीस महासंचालकांना तसेच गृसचिवांना बैठकीसाठी राजधानीत बोलावले आहे.
याआधीही इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीकडे भारतातील काही तरूण प्रेरीत झाल्याचे आढळले होते. जरी मोठ्या प्रमाणावर कुठल्याही संघटनेने इस्लामिक स्टेटशी संधान बांधल्याचे आढळले नसले तरी फुटकळ स्वरुपात असलेला तरुणांचा पाठिंबा वाढू नये, ज्या तरुणांचा ओढा इस्लामिक स्टेटकडे आहे त्यांना वेळीच हुडकावे व संभाव्य धोका टाळावा तसेच इंटरनेटच्या माध्यमातून भारतातली तरूणांना इस्लामिक स्टेटकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न उधळावा आदी विषय या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांनी सायबर विश्वावर लक्ष ठेवत इस्लामिक स्टेटकडे आकर्षित होत असलेल्या तरूणांवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली असून अन्य राज्येही पुढाकार घेण्याची शक्यता आहे.