मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर केंद्राची पाळत?; आपच्या २ खासदारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 07:25 AM2023-05-05T07:25:05+5:302023-05-05T07:25:37+5:30
मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ साध्या वेषात असलेली व्यक्ती उभी राहते. ती आपण दिल्ली पोलिस दलातील असल्याचा दावा करत आहे.
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या ‘विशेष सेल’द्वारे पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप आपच्या दोन खासदारांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
आपचे खासदार संजय सिंह व खासदार राघव चढ्ढा यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ साध्या वेषात असलेली व्यक्ती उभी राहते. ती आपण दिल्ली पोलिस दलातील असल्याचा दावा करत आहे. ही व्यक्ती केजरीवाल यांच्या घरी जाणाऱ्यांची चौकशी करत आहे तसेच येणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवत आहे. हा प्रकार कुणाच्या आदेशावरून सुरू आहे, असा सवाल दोन्ही खासदारांनी पत्रात केला आहे.
ड्रोनद्वारे टेहळणी
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर ड्रोन कॅमेरा टेहळणी करत असल्याचे दिसून आले होते. हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह व गंभीर असून यामागे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोपही नेत्यांनी केला आहे.