सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 01:08 PM2019-05-02T13:08:23+5:302019-05-02T15:08:48+5:30
अवघ्या 28 दिवसांत निकाल जाहीर
मुंबई: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डानं लवकर परीक्षा घेतल्या होत्या. यानंतर अवघ्या 28 दिवसांमध्ये परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण 79.5 टक्के इतकं आहे.
CBSE: Top performing region is Trivandrum with pass percentage of 98.2%, in Chennai region the pass percentage is 92.93% and in Delhi region the pass percentage is 91.87% pic.twitter.com/P7VCCe2I7x
— ANI (@ANI) May 2, 2019
यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले.
CBSE: Hansika Shukla and Karishma Arora have topped the CBSE Class 12 exams scoring 499 marks each. pic.twitter.com/1H3yIF41SS
— ANI (@ANI) May 2, 2019
सीबीएसईचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांना नव्हती. सीबीएसईचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अचानक आज दुपारी आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना आश्चर्याचा धक्का बसला. याआधी सीबीएसईचे निकाल विविध टप्प्यांमध्ये जाहीर व्हायचे. मात्र यंदा सर्व विभागांचे निकाल सीबीएसईकडून एकाचवेळी जाहीर करण्यात आले. जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती.