केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी मध्यातच
By admin | Published: August 19, 2016 05:29 AM2016-08-19T05:29:30+5:302016-08-19T05:29:30+5:30
पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नियोजित तारखेच्या आधीच मांडून ३१ मार्चपर्यंत त्याला संसदेची मंजुरी घेण्याचा विचार केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार
नवी दिल्ली : पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नियोजित तारखेच्या आधीच मांडून ३१ मार्चपर्यंत त्याला संसदेची मंजुरी घेण्याचा विचार केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या मध्यात अर्थसंकल्प मांडण्यावर अर्थ मंत्रालय विचार करीत आहे. हे शक्य झाल्यास सरकारला लेखानुदान मंजूर करून घेण्याची गरज राहणार नाही. तसेच विविध विभागांना १ एप्रिलपासून नव्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार निधी मिळू शकेल.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनेकदा निवडणूक वर्षात अर्थसंकल्प दोन वेळा सादर केला जातो. पहिल्यांदा काही महिन्यांसाठी लेखानुदान मांडून त्याला संसदेची मंजुरी घेतली जाते. निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. चर्चेनंतर अर्थसंकल्प मंजूर होण्यास मे महिन्याचा मध्यकाळ उगवतो. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत मंत्रालयांच्या खर्चावर मर्यादा येतात. अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वीच संसदेत मंजूर झाला, तर विविध विभागांसाठी अधिक सोयीचे ठरेल. अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या मध्यास मांडल्यास हे शक्य होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)