केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात जुलैपासून वाढ
By Admin | Published: June 10, 2017 03:27 AM2017-06-10T03:27:12+5:302017-06-10T03:27:12+5:30
देशभरातील ५0 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना जुलैपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भत्तेही मिळणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरातील ५0 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना जुलैपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भत्तेही मिळणार आहेत. केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यापूर्वीच केली. मात्र भत्त्यांचे प्रमाण ठरविण्यासाठी अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने २७ एप्रिल रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपला अहवाल सादर केला. त्यात भत्त्यांमध्ये काही बदल सुचवले आहेत. आता ते भत्ते जुलैपासून लागू होणार आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांत २७ टक्के घरभाडे भत्ता मिळू शकेल. सातव्या वेतन आयोगाने २४ टक्क्यांची शिफारस केली होती. कर्मचाऱ्यांना सध्या मोठ्या शहरांमध्ये मूळ वेतनाच्या ३० टक्के घरभाडे भत्ता मिळत होता. मात्र सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनातच मोठी वाढ झाली असल्याने घरभाडे भत्त्याची रक्कम आपोआप वाढणार आहे. भत्त्यांसंबंधीच्या प्रस्तावांवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भत्ते न देण्याचे टाळल्याने सरकारच्या तिजोरीवर दरमहा २२00 कोटी याप्रमाणे जानेवारी २0१६ पासून सुमारे ४0 हजार कोटी रुपयांचा भार हलका झाला होता. आता लवासा समितीच्या शिफारशींनुसार भत्ते मिळणार आहेत. इतर भत्त्यांबाबतही निर्णय मंत्रिमंडळाच्या या महिन्यातील बैठकीत होणे अपेक्षित आहे.
या भत्त्यांमध्ये वाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
मात्र ही रक्कम मिळाल्यामुळे कर्मचारी अधिक खर्च करतील आणि तो पैसा बाजारात येऊ न अर्थव्यवसथेला फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र भत्तेवाढीमुळे तिजोरीवर नेमका किती बोजा पडेल, हे स्पष्ट झालेले नाही.