मोदी सरकारची नववर्षाची भेट; आता सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार अधिक व्याज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 07:59 PM2023-12-29T19:59:27+5:302023-12-29T20:00:01+5:30
अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जनतेला आज मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षाच्या आधी सरकारने सुकन्या समृद्धी योजना (SSY), जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी ३ वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत.
एका अधिसूचनेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजात वाढ करण्यात आली आहे. तर अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के केला आहे, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा दर ७.१ टक्के केला आहे. यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज ८ टक्के आणि तीन वर्षांच्या टीडीचे व्याज ७.१ टक्के होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही.
पीपीएफचे व्याज झाले कमी-
PPF व्याजातील शेवटचा बदल एप्रिल-जून २०२०मध्ये झाला होता, जेव्हा तो ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला होता. गेल्या वेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेत कोणताही बदल केला नव्हता. आजच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर ४ टक्के ते ८.२ टक्के दरम्यान होते.
कोणत्या योजना बदलल्या नाहीत?
लहान बचत योजनांतर्गत, जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीसाठी केवळ सुकन्या समाधि योजनेवर (SSY) व्याज आणि ३ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींमध्ये वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व लहान बचत योजना अपरिवर्तित ठेवल्या आहेत. कृपया लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज हे बँक एफडीवरील व्याजापेक्षा जास्त आहे.