शुभवर्तमान! ५० हजार स्टार्टअप कंपन्यांना केंद्र सरकारची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:04 AM2021-06-05T06:04:03+5:302021-06-05T06:04:36+5:30
सहा महिन्यात मिळाली दहा हजार उद्योगांना परवानगी
नवी दिल्ली : देशभरात ५० हजार कंपन्यांना केंद्र सरकारने मान्यता दिली असून, त्यांना विविध कायद्यान्वये साह्य केले जात आहे. यातील १० हजार स्टार्टअप्सना मागील सहा महिन्यांत मान्यता मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) काही वर्षांपूर्वी नियम शिथिल केल्यानंतर स्टार्टअप संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या संस्थांना वित्तीय आणि पायाभूत साह्य मिळण्याचा मार्गही त्यामुळे सुलभ झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, डीपीआयआयटीकडे नोंदणी असलेल्या स्टार्टअपसाठी अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पेटंटच्या दाव्यासाठी त्यांच्या खर्चात ८० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांना करातही सवलत आहे. अर्ज केल्यापासून ९० दिवसांत ते व्यवसाय गुंडाळूही शकतात.
डीपीआयआयटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जून २०२१ रोजी स्टार्टअप म्हणून मान्यता असलेल्या संस्थांची संख्या ५० हजार आहे. एप्रिल २०२० पासून १९,८९६ संस्थांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे.