केंद्र सरकारने अहवाल मागितला
By Admin | Published: February 18, 2016 06:37 AM2016-02-18T06:37:56+5:302016-02-18T06:37:56+5:30
जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशविरोधी आणि अफझल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली असतानाच केंद्र सरकारने प. बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे
कोलकाता : जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशविरोधी आणि अफझल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली असतानाच केंद्र सरकारने प. बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे. कुलगुरू सुरंजन दास यांनी मात्र काढण्यात आलेली रॅली अधिकृत नव्हती आणि तिचा विद्यार्थी संघटनेशी संबंध नव्हता आणि रॅलीत देशविरोधी घोषणाही देण्यात आल्या नव्हत्या, असा खुलासा केला आहे.
विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध मार्चसंबंधी परिस्थिती आणि घटनाक्रमाचा संपूर्ण तपशील सादर करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने प. बंगाल सरकारला दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कन्हय्या कुमारला पाठिंबा देण्यासाठी मार्च काढत अफझल गुरू, बनावट चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ हिच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाच्या परिसरात काश्मीर, मणिपूर आणि नागालँडच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी पोस्टर्स आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘हम क्या चाहे... आझादी’. ‘काश्मीर की आझादी, मणिपूर की आझादी, नागालँड की आझादी’ अशा घोषणा लिहिलेले पोस्टर्स विद्यापीठाच्या परिसरात आढळून आले. रॅडिकल अशी स्वाक्षरी केलेल्या गटाने हे पोस्टर्स टाकले. आम्ही हे पोस्टर्स टाकलेले नाहीत, असा दावा विद्यार्थी संघटनेचा एक नेता सौनक मुखर्जी याने केला.स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) प्रदेश सचिव देबोज्योती दास यांनी जादवपूर विद्यापीठात अफझल गुरूच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या घोषणांशी संबंध असल्याचा इंकार केला आहे. तिथे दिल्या गेलेल्या घोषणांना आमचा पाठिंबा नसून, अशा बेजबाबदार कृत्यासाठी जादवपूर विद्यापीठातील संपूर्ण विद्यार्थी समुदायाला जबाबदार धरता येणार नाही, असे ते म्हणाले.