क्रॉस बॉर्डर फायरिंगमधल्या नुकसानाची केंद्र सरकार करणार भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 05:52 PM2018-02-26T17:52:07+5:302018-02-26T17:52:07+5:30
सीमेपलीकडून होणा-या पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्यांची केंद्र सरकार भरपाई करणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या माध्यमातून ही नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
जम्मू-काश्मीर- सीमेपलीकडून होणा-या पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्यांची केंद्र सरकार भरपाई करणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या माध्यमातून ही नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. सीमेपलीकडून होणा-या गोळीबारात अनेकांना नुकसान सोसावं लागतं. अशा लोकांना आता केंद्र सरकार जम्मू-काश्मीर सरकारच्या सहाय्यानं नुकसानभरपाई देणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकी सुरू असतात. क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये स्थानिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागतो. ब-याचदा या गोळीबारात नागरिकांना जीवही गमवावा लागतो. काही तासांपूर्वीच पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला. परंतु या हल्ल्यात तो स्वतःच शिकार झाला असून, पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलीस कर्मचा-याला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
काश्मीर घाटीमध्ये सध्या 30 ते 40 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. लीपा घाटी, मंडल, रामपूर आणि इतर ठिकाणी हे दहशतवादी 30 ते 40च्या संख्येत असून, ते समूहानं राहत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जेव्हा गोळीबार करण्यात येतो, त्यावेळीच हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. कुपवाडा आणि तंगधारमध्ये अशाच प्रकारे दहशतवादी घुसले होते. पाकिस्तानकडून होणा-या गोळीबारात भारतातल्या सीमेवरच्या लोकांना मोठ्या प्रमाणात वित्तहानीचा सामना करावा लागतो. गेल्या काही तासांपूर्वीच सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.