कोरोनामुळे बेकार झालेल्यांना ३ महिन्यांचा निम्मा पगार देणार, केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:12 AM2020-09-14T02:12:24+5:302020-09-14T06:01:50+5:30
यंदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी)चे सदस्य असतील अशांनाच याचा लाभ मिळेल.
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या संकटामुळे नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम अटल विमा कल्याण योजनेच्या अंतर्गत मदत स्वरूपात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचा ४१ लाखांहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.
यंदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी)चे सदस्य असतील अशांनाच याचा लाभ मिळेल.
कोरोनाच्या संकटामुळे देशात १२ कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बेकार झाले आहेत. त्यामध्ये विविध कारखान्यांत काम करणाºया, पण आता हाताला रोजगार न उरलेल्या १.९ कोटी लोकांचा समावेश आहे. ईएसआयसी योजनेचे लाभधारक कामगार बेकार झाल्यास त्यांना तीन महिन्यांच्या एकूण पगाराच्या पावपट रक्कम बेकार भत्ता म्हणून दिली जात असे. मात्र आता या नियमांत बदल करून ही रक्कम निम्मी करण्यात आली आहे. या योजनेस १ जुलैपासून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून ती आता पुढील वर्षी ३१ जूनपर्यंत लागू राहील.