BREAKING: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न; मोदी सरकारची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:10 PM2024-01-23T20:10:52+5:302024-01-23T20:12:02+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी कर्पुरी ठाकूर यांची १०० वी जयंती असून, या पूर्वसंध्येला सरकारने ही मोठी घोषणा केली. जनता दल युनायटेडने (JDU) कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. ठाकूर यांना भारतरत्न मिळणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून देण्यात आली. सरकारच्या या निर्णयानंतर जदयूने मोदी सरकारचे आभार मानले.
कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आम्हाला ३६ वर्षांच्या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या १५ कोटी जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानू इच्छितो.
कोण होते कर्पुरी ठाकूर?
बिहारचे जननायक म्हणून कर्पुरी ठाकूर यांची ओळख होती. कर्पुरी ठाकूर १९७० च्या दशकात दोनदा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्रीही होते. स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच शिक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. मागासलेल्या समाजातून आलेला नेता म्हणून त्यांनी जनतेच्या मनात घर केले. मंडल आंदोलनापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते.
२४ जानेवारी १९२४ रोजी जन्मलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची ओळख स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि ज्येष्ठ समाजवादी राजकारणी अशी राहिली. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. तसेच उपमुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्ष नेते अशी विविध पदेही भूषवली होती. त्याबरोबरच १९५२ साली पहिल्यांदा आमदार बनल्यानंतर ते दीर्घ राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभूत झाले नव्हते. आजच्या बिहारच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जाणारे लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील कुमार मोदी हे त्यांचे शिष्य आणि राजकीय राजकीय वारसदार मानले जातात.
१९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार...
एक लढवय्या नेता म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी १९५२ मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून विजयी होऊन प्रथमच आमदार होण्याचा मान पटकावला. १९६७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत युनायटेड सोशलिस्ट पार्टी कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आली. याचा परिणाम राज्यातील सत्तेवरही झाला अन् काँग्रेसला जनतेने नाकारले. तेव्हा बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.